• Wed. Apr 30th, 2025

नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढीन!

Byjantaadmin

Jun 5, 2023

पुणे: पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत खडसावले आहे. मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीला पाहता आज पदाधिकारी मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी थेट कानाखाली मारण्याचा इशारा दिला आहे. मुळशी तालुक्यातील माजी नगरसेवक सुनील चांदरे, आणि बाबा कंदारे यांच्या एका लग्नात टोकाचं वाद पेटला होता. याची चर्चा मुळशी तालुक्यात गाजली होती. हाच प्रसंग लक्षात घेता आज पदाधिकारी बैठकीत अजित पवार यांनी थेट पद दिलेल्या पदाधिकाऱ्यांना काम करा, नाहीतर एकेकांच्या कानाखाली वाजवील, असा थेट इशारा दिला आहे. मात्र, भरसभेत अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे पदाधिकारी नाराज झालेत का, याबाबत आम्ही तिथल्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन पूर्ण होऊन आपण २५ व्या वर्धापन दिनामध्ये प्रवेश करत आहे. याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मुळशी येथील सगळे पदाधिकारी आले आहेत. मुळशीच्या लोकांनी पण काम करायचे आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिलेली आहेत, म्हणून भांडायचं नाही. नाहीतर एक एकांचा कानाखाली आवाज काढीन. याच्यातून तुमची नाही आमची बदनामी होते. पवार साहेबांची बदनामी होते. हा कुठला फाजीलपणा चालला आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

आगामी काळात विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे. महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यापक समाजहिताचे राजकारण केले. तेच राष्ट्रवादीला अभिप्रेत आहे. भविष्यात सत्ताकारणात नवे चेहरे देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा लोकांच्या संपर्कात राहावे. तसेच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतत लावून धरली पाहिजे, असे आदेशही अजित पवार यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *