मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विनोद तावडे यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये यासंदर्भात भाष्य केले. यावेळी विनोद तावडे यांनी म्हटले की, मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत स्तरावर वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाली आहे. खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असेही विनोद तावडे यांनी म्हटले. परंतु, माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, अशी पुस्तीही विनोद तावडे यांनी जोडली.