MUMBAI: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रविवारी भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
AMIT SHAH यांच्यासोबतच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमची वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचारातील ही युती आहे. या राज्यात काम करत असताना, विकास प्रकल्प पुढे नेत असताना पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. अनेक प्रस्तावांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली.आमच्या सरकारच्या युतीमध्ये कसलेही मतभेद नाही. आमच्यात मतभेद असल्याच्या विरोधकांकडून वावड्या उठवल्या जातात. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे ते अशा वावड्या उठवतात, असा टोला त्यांनी लगावला. मागील अडीच वर्षाच्या काळात सर्व कामे थांबली होती. कामांना ब्रेक लागला होता. हे सर्व आम्ही हटवले आहे. राज्यात अनेक प्रकल्प पुढे जात आहे, हे दृश्य स्वरुपात लोकांना दिसते. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, असे शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, या बैठकीत राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. ”कॅबिनेट विस्ताराबाबतही चर्चा झाली. तो निर्णय लवकरच होईल, त्याला काहीही अडचण नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.