मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील वातावरण अचानक बदललं आहे. यंदाच्या हंगामातील मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळं आता गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशीव तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. प्रचंड उकाडा असल्याने नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत होती. परंतु दुपारी बारा वाजेनंतर अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तसेच कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळं जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पत्रे उडाले असून शेकडो झाडे कोसळल्याची माहिती आहे. याशिवाय विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहे.
पुणे शहरात अवकाळी पावसाची हजेरी…
मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पुणे शहरातील भेकराईनगर, हडपसर, रेसकोर्स परिसर, मावळ आणि दक्षिण पुणे शहराच्या भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.
आज दुपारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांची तारांबळ उडाली आहे.
आज सकाळपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी काही क्षणात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. याशिवाय त्रंबकेश्वर परिसरातही पावसाने धुमाकूळ घातल्याने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तासभर झालेल्या पावसामुळं नाशिकसह त्रंबकेश्वरमधील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. नाशिकमधील सुरगणा, सिन्नर, येवला, त्रंबकेश्वर आणि निफाड या तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याची माहिती आहे.यंदाच्या हंगामातील मान्सून अंदमानामार्गे केरळात दाखल झाला आहे. त्यानंतर आता येत्या १० ते १५ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. परंतु आता त्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाची सुरुवात झाल्यामुळं नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे