पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. पुण्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटलेला असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळं आता अजित पवारांच्या नव्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मतदारसंघात ज्या पक्षाच्या उमेदवाराची ताकद जास्त असेल त्या पक्षाला तेथील जागा देण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी जागावाटपांच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आम्ही सर्व नेते सध्या फक्त अंदाज घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयारी करत आहे, प्रत्येक राजकीय हालचालीवर आमचं लक्ष असून जो पक्ष चांगलं काम करेल, त्यालाच लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा संदर्भ आहे. त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावरून मविआत सुप्त संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावले म्हणून कुणालाही त्रास होण्याचं कारण नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत असल्यामुळे त्यांनी पोस्टर लावले असतील. परंतु असंच कुणालाही मुख्यमंत्री होता येत नाही. ज्या पक्षाकडे १४५ आमदारांचा आकडा आहे, त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची संधी असते. त्यामुळं नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागले असतील तर त्यात काहीही अडचण नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.