• Sun. May 4th, 2025

होम पिचवरच मंत्री दादा भुसेंविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार:चौथ्यांदा आमदार, दहा वर्षे मंत्रिपद असूनही पाने पुसल्याचा आरोप

Byjantaadmin

Oct 27, 2022

मालेगाव:-शिंदे गटाचे दोन आमदार असूनही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर दादा भुसे यांची ताकद वाढल्याचे चित्र असताना त्यांच्या दाभाडी बाह्य या विधानसभा मतदारसंघातच दहिकुटे व बोरी अंबेदरी या लघुपाटबंधारे प्रकल्पांचे कालवे पाइपबंद करण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. शिंदे गटाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने काळे झेंडे दाखवत ‘दादा भुसे चले जाव’, ‘दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा दिल्याने तणाव वाढला. दरम्यान, भुसे समर्थकही आक्रमक झाल्याने गोंधळ वाढला होता. प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांना भुसेंच्या समर्थकांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली.

भुसे यांच्याकडे भाजप व सेनेची सत्ता असताना तसेच महाविकास आघाडी काळातही मंत्रिपद कायम राहिले. मात्र, त्यानंतरही त्यांना विरोधाची धार कमी करता आलेली नाही. त्याचा प्रत्यय बोरी अंबेदरी व दहिकुटे या लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या बंदिस्त कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाल्यानिमित्त आयोजित भूमिपूजन सोहळ्यात आला. अंबेदरी येथील कार्यक्रमात बंदिस्त कालव्याला दहिदी, अस्ताणे, वनपट, राजमाने या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आंदोलनात भूषण कचवे, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद कचवे, निवृत्ती अहिरे, मनोज कचवे, प्रताप पवार शिवम भदाणे सहभागी झाले होते.

जमिनीवर बसून जमवले; आंदोलकांनी अस्मान दाखवले
शेतकऱ्यांचा रोष बघता भुसे यांनी वाहनातून उतरून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रकल्पाचे फायदे समजावून सांगितले. मात्र, शेतकऱ्यांनी आमच्या पाण्याचे व शेतीचे काय होणार हे सांगा अशा प्रश्नांची सरबत्ती केली. अखेरीस भुसेंनी काढता पाय घेत भूमिपूजन उरकले.

भुसे हे दाभाडी बाह्य विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार तर सलग १० वर्षे मंत्रिपदावर आहेत. भाजप-सेना युतीत त्यांच्याकडे कृषिमंत्रीपद तर आता गौण खनिज व बंदरे खाते असून नाशिकचे पालकमंत्रिपद आहे. सामान्य शेतकरी कार्यकर्ता म्हणून राजकारणात दबदबा असलेल्या हिरे घराण्याविरोधात मतदारांनी भुसे यांना चाल दिली होती. आता शेतकऱ्यांच्या मुद्यावरूनच भुसेंविरोधात पहिलेच बंड झाल्यामुळे ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

आंदोलनस्थळावर काही लोकांनी धमकी दिल्याचा आरोप पगार यांनी केला. गुंडगिरी ग्रामीण भागात पोहोचली असून अशांना वेळीच ठेचले नाही तर गुंड प्रवृत्ती अधिक फोफावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

पाइपबंद कालव्यांमुळे पाण्याची गळती शंभर टक्के बंद होईल. उपलब्ध सर्व पाणी सिंचनाच्या वापरात येईल. अन्याय होणार नाही. प्रकल्पाला विरोध दुर्दैवी आहे. काळच याचे उत्तर असेल. – दादा भुसे, पालकमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *