• Sun. May 4th, 2025

समीर वानखेडेंचा प्रसिद्धीचा मोह सुटता सुटेना

Byjantaadmin

Oct 27, 2022

वाशीम : मुंबई अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची कारकीर्द चांगलीच वादळी ठरली होती. त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे ते प्रसिद्ध झालेत. त्यांचा प्रसिद्धीचा मोह अजूनही सुटलेला नाही, असे दिसते आहे. नुकतेच एका वर्तमानपत्रामध्ये वानखेडे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात केली. या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वानखेडेंनी या संदर्भात आपल्या विभागाची परवानगी घेतली का ? प्रसिद्धीकरिता जाहिरात देताना पदाचा विचार करणे गरजचे आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर वानखेडे चांगलेच प्रकाशझोतात आले होते. वानखडे २००८ च्या तुकडीचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजु झाल्यानंतर त्यांची पहिली बदली मुंबईत सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त म्हणून झाली. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्रप्रदेश आणि दिल्लीतही पाठविण्यात आले. त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादळी ठरला होता. त्‍यांच्यावर माजी मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. आता एका वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, भारत सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला जाहिरातीची गरज का ? त्यांच्या विभागाकडून त्यांनी तशी परवानगी घेतली का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. समीर वानखेडे यांचा प्रसिद्धीचा मोह सुटता सुटत नसल्याचे बोलले जात आहे.

समीर वानखेडे यांच्यावर बॉलीवुडला टार्गेट करण्याचा आरोप होतो. परंतु त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर ह्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री असून २०१७ मध्ये या दोघांनी विवाह केला होता. क्रांती यांनी जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल, अशा मराठी चित्रपटात काम केलेले असून त्या प्रसिध्दी अभिनेत्री आहेत.

समीर वानखेडे यांचे मुळ गाव वाशीम जिल्हातील रिसोड तालुक्यातील वरुड तोफा हे असून त्यांचे काका व इतर नातेवाईक गावातच राहतात. समीर वानखेडे हे मुंबईत वास्तव्यात असले तरी त्यांचे कधी मधी गावाकडे येणे जाणे सुरुच असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *