औसा मतदारसंघात वसुंधरारत्न शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ
औसा – वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वसुंधरा व वृक्षावर असलेल्या प्रेमापोटी त्यांचे शिष्य म्हणून या स्पर्धात्मक अभियानासाठी सर्वानी झोकून देऊन काम करायचे आहे.देशात लातूर जिल्हा हा सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा असून जिल्ह्य़ातील वनक्षेत्र वाढविणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या अभियानातून जिल्ह्य़ात औसा मतदारसंघ सर्वाधिक वनक्षेत्राचा मतदारसंघ करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आपण भरीव विकासनिधी देणार असून विकासाची स्पर्धा व स्पर्धेतून विकास साधण्याचे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
औसा तालुक्यातील ताबंरवाडी व हिप्परगा (क) येथे (दि.१) जून रोजी आयोजित या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ताबंरवाडी येथे सुरेखा देवीदास जगताप या महिला शेतकऱ्याच्या तर हिप्परगा येथे प्रा सुधीर पोतदार यांच्या शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करून प्रत्यक्षात या अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर जिल्हा कृषी अधीक्षक रक्षा शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी बी. पी. जाधव, तहसीलदार सुनील पाटील, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, कृषी अधिकारी संजय ढाकणे, बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, अॅड परिक्षीत पवार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे, मारुती महाराजचे चेअरमन गणपत बाजुळगे, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे बोलत होते की औसा मतदारसंघात शेतरस्ते अभियानातून राज्याला दिशादर्शक ठरेल असे काम होत असताना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत शेतरस्ता देण्याचे उद्दिष्ट आहे.या कामात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची कणखर भूमिका शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोलाचे योगदान ठरले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण महत्वपूर्ण अभियान सुरू केले आहे.जिल्हयाचे वनक्षेत्र केवळ दोन टक्के हि दुर्दैवी बाब असून वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी अभियानात शेतकऱ्यांनी पुढे यावे. फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करावा. शासनाच्या योजनेतून आर्थिक विकास साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सलग फळबाग लागवड झालेल्या शेतकऱ्यांना जनावरांचे गोटे देण्यात यावेत आशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या प्रसंगी ताबंरवाडी सरपंच राधाकृष्ण जाधव, उपसरपंच दिपक बिराजदार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, हिप्परगा सरपंच संतोष गोरे,उपसरपंच अॅड घोगरे, कृऊबा संचालक विकास नरहरे, प्रकाश काकडे,रमाकांत वळके, मोहन कावळे, बंकट पाटील, अर्जुन घाडगे,चंद्रकांत ढवण आदी उपस्थित होते.
वनक्षेत्राचा लातूर पॅटर्न निर्माण करावा – जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज
राज्यात शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्य़ात वनक्षेत्र वाढविण्यासाठी आपण गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. यासाठी जिल्हावाशियांनी स्व:ताहून पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीचा लातूर पॅटर्न तयार करण्याची गरज आहे. ५६ दिवसाच्या या स्पर्धात्मक अभियानासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करायचे आहे.आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्ते अभियानातून मोठ्या प्रमाणात शेतरस्ते तयार केले आहेत. हि निश्चित शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाचे अभियान असून लातूर जिल्ह्यात प्रशासनाने ५ हजार शेतरस्ते अतिक्रमण मुक्त केल्याचे सांगून मनरेगावर अवलंबून न राहाता शेतकऱ्यांनी स्वत :हून बांधावर वृक्ष लागवड करावी तर ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवडीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी राज्यात सातारा व लातूर या दोन जिल्हयाची निवड केली असून बांबू लागवडीसाठी साठी शासन १ हेक्टरला ३ वर्षात ६ लाख ९० हजार अनुदान देत आहेत यासाठीही शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी बोलताना जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.