भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यात काही मुद्यांवर राजकीय तडजोड झाल्याचे चित्र आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राजकारण बाजुला ठेवत असल्याची भूमिका घेत मुंडे भाऊ बहिण यांनी काही निर्णय घेतले. यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध झाली.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 50 उमेदवारांचे अर्ज आले होते. पण 29 उमेदवारांना अर्ज मागे घेतले. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. आधी 50 पैकी 26 उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी फुलचंद कराड आणि इतर 2 उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे 11 आणि धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 10 सदस्य वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते. पण सहकारी संस्थेत राजकारण नको. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणे महत्त्वाचे आहे; अशी राजकीय तडजोडीची भूमिका घेत यथावकाश पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संघर्ष टाळला.