मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन लोकसभा मोहिमेला सुरुवात केली आहे. गेली दोन दिवस मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत नावे पुढे आलेल्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दर्शवित विधानसभा निवडणूक लढविण्यास पसंती दिली आहेत. यात कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, जळगावचे गुलाबराव देवकर, अनिल पाटील, तसेच खासदार अमोल कोल्हे यांनीही आगामी लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छूक नसल्याचे माहिती आहे. यातील मुश्रीफ, देवकर आणि पाटील यांनी विधानसभा लढविण्यास आपली पसंती दर्शविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३० आणि ३१ मे या दोन दिवशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाचा आढाव घेण्यात आल्याचे समजते. विदर्भ आणि मराठवाड्यातील बैठकांचा आढावा पाच जूननंतर घेण्यात येणार असल्याचे समजते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली आहे. त्यात त्या त्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची नावे पुढे आली. त्यात कोल्हापूर माजी मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवावा, अशी मागणी पुढे आली. मात्र, कागल यांनी त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आपण कोल्हापूर लोकसभेऐवजी कागलमधून विधानसभा निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले.जळगावमधूनही गुलाबराव देवकर यांचे नाव लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पुढे आले होते. मात्र, देवकर यांनी आपण जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देकवर यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास पसंती दिली. त्यानंतर अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनाही गळ घालण्यात आली. मात्र, आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक नसल्याचे बैठकीतच सांगून टाकले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.शिरूर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आपण लोकसभेची आगामी निवडणूक लढविण्यार नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे. त्या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे स्ट्राँग उमेदवार आहेत. पण, ते लोकसभा लढतील की नाही, याबाबत शंका आहे.
या बैठकीशिवाय धनंजय मुंडे यांनीही काही दिवसांपूर्वी ‘लोकसभा निवणूक लढविण्यास आपण अजून लाहान आहोत, असे सांगितले होते, त्यामुळे परळीत पुन्हा बहिण भावांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा सत्ता येण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या आमदारांना वाटते, त्यामुळे लोकसभा लढविण्याऐवजी विधानसभा लढून राज्यात मंत्री होता येईल, असा अनेकांचा होरा आहे.