वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. कुणी कोणत्या मतदारसंघात लढायचे हे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानूसार शिवसेना ठाकरे गट मराठवाड्यातील चार तर काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघात लढण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून पुर्वीच्या जिंकलेल्या धाराशीव, परभणी, हिंगोली आणि थोडक्यात पराभव झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी बीड आणि जालना मतदारसंघातून तर काॅंग्रेसकडे लातूर आणि नांदेड हे दोन मतदारसंघ राहतील. शिवसेनेत फूट पडल्यामुळे ठाकरे गटाला एखादा मतदारसंघ सोडावा लागेल अशी चर्चा होती, मात्र त्यात कसलेही तथ्य नसल्याचे समजते.
ठाकरे गट परभणी, हिंगोली, धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या जागेवरचा ठाकरे गटाचा दावा कायम आहे, काॅंग्रेस-राष्ट्रवादी देखील त्यास अनुकूल आहे.
धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर तर हिंगोली हेमंत पाटील, परभणी संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार आहेत. पैकी हेमंत पाटील शिंदे गटासोबत गेले आहेत. तर ओमराजे आणि जाधव हे ठाकरे गटासोबतच आहे. त्यामुळे या तीनही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहेत. लातूर लोकसभेची जागा आघाडीमध्ये पुर्वीपासूनच काॅंग्रेसकडेच आहे, नांदेड हा अशोक चव्हाण आणि काॅंग्रेसचा गड असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघावर काॅंग्रेसचा दावा कायम आहे.
या शिवाय हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काॅंग्रेसकडून दावा केला जातोय, पण तो मान्य केला जाणार नाही. ठाकरे गट ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेस बीडसह जालना मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत आहे. जालना लोकसभेची जागा काॅंग्रेस सातत्याने हारत असल्याने इथे राष्ट्रवादीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसने अद्याप जालन्याच्या जागेवरील दावा सोडला नसला तरी यावर तडजोडीची दाट शक्यता वर्तवली जात आहे.