महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदे फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात प्रचंड विष आहे. आगामी काळात हे सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याकरता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नामी शक्कल लढवली आहे. ते आज एका कार्यक्रमात बोलत होते.
“जयंत पाटलांशी बोलून ५० हजार छोट्या पुस्तिका काढण्याच्या विचारात आहे, ज्यातून आपण सगळं सांगणार आहोत. पन्नास खोके आणि न्यायाविरोधात बनलेलं सरकार या दोन गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो तर कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल महाराष्ट्रात लागेल. २०० पेक्षा आपण कमी येणार नाही. म्हणून आपण सगळं करतोय”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कर्नाटकात काँग्रेसला यश मिळालं. काँग्रेसची हीच जादू आता इतर राज्यात चालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही CONGRESS मॉडेल आणण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आधी लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आगामी काळ हा निवडणुकांचा असणार आहे, असं राजकीय नेत्यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
“शिवसेना शिंदे गटाने नवीन WHIP नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा भरत गोगावले यांच्या WHIP ला मान्यता देता येणार नाही हा दिलेला निकाल त्यांनी देखिल मान्य केलेला आहे. त्यामुळे WHIP ने बजावलेल्या सगळ्याच नोटीस गैरलागू होतात. निकाल इतका स्पष्ट आहे. WHIP शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांचाच लागू होणार हे आता शिंदे गटानेही मान्य केले आहे”, असं ट्वीट काही दिवसांपूर्वी JITENDRA AWAD यांनी केलं होतं.