गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आता शेतीच्या मशागतीची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई आणि कोकणातील वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेने होरपळत असलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीगर, जालना, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली होती. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी नाशवंत मालाची काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची पावसाच्या अंदाजामुळे डोकेदुखी वाढली आहे.सोमवारी संध्याकाळी पाच वाजेनंतर पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळं पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भंडारा, अकोला, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावत धुंवाधार बॅटिंग केली होती. त्यातच आता मराठवाडा विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे