सध्या चित्रपटगृहांमध्ये गाजत असलेल्या केरला स्टोरीची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. अनेक लोक मित्रमैत्रिणींसोबत केरला स्टोरी चित्रपट पाहण्यासाटी जात आहे. परंतु आता केरला स्टोरी चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. सनी कृपाशंकर गुप्ता असं आरोपीचं नाव असून तो मुंबईतील घाटकोपरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सनी गुप्ता हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो येरवडा परिसरात राहत असल्यामुळं महिलेने ओळखीच्या विश्वासातून मुलीला त्याच्याबरोबर द केरला स्टोरी चित्रपट पाहण्यास जाण्याची परवानगी दिली. परंतु आरोपी सनी गुप्ताने तरुणीला केरला स्टोरी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये न नेता घरी घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तरुणीचा विनयभंग करत घडलेला प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने तातडीनं घरी येत सर्व प्रकार आईला कानावर घातला. त्यानंतर मुलीच्या आईने थेट येरवडा पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली आहे.
चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी सनी गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच येरवड्यात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.