पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (ता. २८) नव्या संसदेचे लोकार्पण झाले. त्याच दरम्यान, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी (Police) बळाचा वापर करुन हाणून पाडला.
या वेळी कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापटही झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला खेळाडूंना अशी वागणूक मिळाल्याने काँग्रेससह विरोधीपक्षांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. congress अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia), विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ वरुन पंतप्रधानांवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह काही खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करत आहेत. या वेळी modi विनेश फोगाटला ”तू तर माझ्या कुटुंबातीलच एक आहे” असे म्हणत आहेत. तसेच, ”तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो”, असेही ते या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
हमारे देश की बेटियां pic.twitter.com/T5e8n7WpoG
— Congress (@INCIndia) May 28, 2023
तसेच, ”तुला मी निराश पाहू शकत नाही”, असेही मोदी म्हणत आहेत. काँग्रेसने हा फोटो ट्वीट करून ”हमारे देश की बेटिया” असे म्हटले आहे. त्याच बरोबर या व्हिडीओला काँग्रेसने जोड देत आजच्या आंदोलनाचे आणि पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेत असल्याचा व्हिडीओ जोडला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू यांनी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मार्चचे आयोजन केले होते. त्यानुसार कुस्तीपटू ११. ३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतले आहे.