राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांना या मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा लागली आहे
असे असतानाच आता भाजपच्या इच्छुक आमदारांनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी तगादा लावल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करून मंत्रीपदासाठी काही आमदारांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे साकडे घातल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये देखील छुपी नाराजी असल्याचं बोललं जात आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आशा या आमदारांना दाखविल्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेकवेळा दिले. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आजपर्यंत आठ वेळा विस्ताराच्या मुहूर्ताची चर्चा झाली.
पण चर्चा होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने (शिंदे गट) उघड नाराजी दिसून आली. तर २३ किंवा २४ मे च्या दरम्यान मंत्र्यांचा शपथविधी होईल, याची चर्चा रंगली होती. मात्र, तसं काही झालं नाही.भाजपचे आमदार उघडपणे याबाबत काही बोलत नव्हते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता दिसत नसल्याने मंत्रीपदाची आशा असलेल्या काही आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे ग्राहाणी मांडल्याचे समजते.
दरम्यान, विधानसभेच्या election सव्वा दीड वर्षावर असताना आणखी काही आमदारांना विस्तारात घेण्याची अपेक्षा या आमदारांची व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या (शिंदे गट) संभाव्य आमदारांची नावे निश्चित झाली आहेत. पण bjp कडून विस्ताराचे ठरत नसल्याकडे शिवसेनेचे आमदार बोट दाखवत आहेत. यातूनच आता भाजपच्या आमदारांनी श्रेष्ठींकडे धाव घेतल्याची चर्चा आहे.