कर्नाटकात काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड देत बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यंमत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता कर्नाटक सरकारचा पहिला कॅबिनेट विस्तार आज होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रात्री उशिरा दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात यावी, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांनी आमदारांच्या यादीला हिरवा झेंडा दाखवला असून आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या शपथविधीवेळी अन्य चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता तब्बल ३४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आल्यामुळं डीके शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांना यावेळच्या कॅबिनेट विस्तारात मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. याशिवाय सिद्धरामय्या हे देखील निकटवर्तीय आमदारांना संधी देण्यासाठी आग्रही असल्याचं समजतं. त्यामुळं आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या सुप्त संघर्ष रंगण्याची चिन्हं आहेत.
मंत्रीपदासाठी कोणत्या नावांची चर्चा?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काँग्रेसने सर्व समाजघटकातील आमदारांना मंत्रिपद देण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांना समान संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संजय पाटील, नुरुद्दीन सैथ, एनवाय गोपालकृष्ण, अनिल लाड, के वसंत बंगेरा, रुद्रेश गौडा, वदनल राजण्णा, सीपी योगेश्वर, आरव्ही देवराज, के सुधाकर आणि गणेश हुक्केरी या आमदारांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तसेच ऐनवेळी नवख्या चेहऱ्यांनाही मंत्रिपद देण्यात येणार आहे.