• Wed. Apr 30th, 2025

विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये

Byjantaadmin

May 27, 2023

देशभरात स्वस्त आणि चांगला सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिले जाते. देशभरात असलेल्या रेल्वेच्या जाळ्यांमुळे प्रवाशांकडून रेल्वेला पसंती दिली जाते. जगभरात सर्वाधिक रेल्वे प्रवाशांची संख्या भारतात आहे. मात्र, त्याच वेळेस विनातिकीट प्रवास (Without Ticket Travelling) करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मागील आर्थिक वर्षात रेल्वेला विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून मोठी कमाई झाली आहे.

रेल्वेने 2022-23 मध्ये चुकीच्या तिकिटांसह किंवा विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3.6 कोटी प्रवाशांना पकडले. वर्ष 2021-22 च्या तुलनेत अशा प्रवाशांची संख्या एक कोटींहून अधिक वाढली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. आरटीआयच्या उत्तरानुसार, 2019-2020 मध्ये 1.10 कोटी लोक विना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले, तर 2021-22 मध्ये ही संख्या 2.7 कोटी आणि 2022-23 मध्ये 3.6 कोटी इतकी झाली. तर 2020-21 मध्ये कोविड-19 महासाथीच्या आजाराची लाट पसरली होती. त्या वर्षी हा आकडा 32.56 लाख होता.

मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या आरटीआय प्रश्नाच्या (RTI) उत्तरात, रेल्वेने गेल्या तीन वर्षांत अशा प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेची माहिती दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 152 कोटी रुपये, 2021-22 मध्ये 1,574.73 कोटी रुपये आणि 2022-23 मध्ये 2,260.05 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

2022-23 या वर्षात, रेल्वेने तिकिटांशिवाय पकडलेल्या प्रवाशांची संख्या अनेक छोट्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. विनातिकीट प्रवास करणे (Without Ticket) हा दंडनीय गुन्हा आहे. विनातिकीट प्रवास केल्यास प्रवास भाडे आणि 250 रुपयांचा दंड ठोठावला जातो. मागील काही वर्षात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. तर, दुसरीकडे त्या तुलनेत कमी रेल्वे असल्याचे समोर आले आहे. कोरोना महासाथीच्या (Corona) काळात अनेक एक्स्प्रेस गाड्या (Express Train) रद्द करण्यात आल्या. त्या एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या नाहीत. त्याच्या परिणामी रेल्वेतील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आरक्षित डब्यांमध्येही सामान्य तिकीटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामध्ये आरक्षित अथवा तात्काळ कोट्यातून तिकीट कन्फर्म न झालेल्या प्रवाशांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *