• Wed. Apr 30th, 2025

माफियांची दादागिरी वाढली! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न

Byjantaadmin

May 27, 2023

एकीकडे सरकार राज्यात नवीन वाळू धोरण राबवण्याच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र वाळू माफियांची (Sand Mafia) दादागिरी वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली की, बीडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरहून बीडला येताना एका वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चक्क बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने एक किमीपर्यंत पाठलाग केला, परंतु तो हाती लागला नाही. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगीजवळ घडली असून, याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळूमाफियांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Maharashtra News Beed News  An attempt to tipper the vehicle of the Collector of Beed case has been filed with the police Beed News : माफियांची दादागिरी वाढली! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न

अधिक माहितीनुसार, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या त्यांच्या शासकीय कार (एमएच 23-बीसी 7585) मध्ये छत्रपती संभाजीनगरहून बीडला येत होत्या. यावेळी त्यांचा बॉडीगार्ड सोबत होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे त्यांची कार आली असता एकाविना क्रमांकाच्या टिप्परने मुधोळ यांच्या कारला कट मारला. त्यानंतर पुढे गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्डने टिप्परला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने टिप्पर थांबवला नाही. तर मुख्य मार्गावरून गावातील रस्त्यावर टिप्पर घातले व काही अंतरावर जाऊन वाळू रस्त्यावर टाकून पळून गेला. हा प्रकार जिल्हाधिकारी मुधोळ यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविला. त्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लागली व टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने मुधोळ यांनी काही दिवसांपूर्वी कारवाया केल्या होत्या. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम…

जिल्हाधिकारी मुधोळ या छत्रपती संभाजीनगर येथून बीडला येत असताना पाडळसिंगीजवळ त्यांना एक विना क्रमांकाचा टिप्पर दिसला. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांचा सुरक्षारक्षक पोलिस कर्मचारी खाली उतरून चालकाच्या बाजूने लटकले. वाहन थांबविण्यासाठी चालकाला सांगत होते. परंतु तो भीतीपोटी ट्रक चालक पळून गेला. दूरवर जाऊन त्याने वाळू खाली केली आणि तो फरार झाला. याबाबत जिल्हाधिकारी मुधोळ यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कॉल केला. तर जिल्हाधिकारी यांचा फोन येताच बीड, गेवराई आणि विशेष शाखेच्या पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले, त्याप्रमाणे एलसीबीने टिप्पर ताब्यात घेऊन चालकालाही अटक केली आहे. चालकाविरोधात कलम 307 प्रमाणे गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा घटनाक्रम पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांना सांगितला आहे. तर वाळू माफियांची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. या प्रकरणातच नव्हे, तर आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *