महाराष्ट्र महाविद्यालयात अंतरविभागीय अंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा संपन्न
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथे आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्याअंतर्गत अ ब क ड असे झोन आहेत. या झोनअंतर्गत मुलींचे तीन संघ व मुलांचे चार संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय विजय पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना खिलाडू वृत्तीने आपला खेळ करण्याचे आवाहन केले. या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. बब्रुवान सरतापे महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, माजी संचालक क्रिडा व शारीरिक शिक्षण विभाग स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड व निवड समितीचे प्रमूख डॉ. मनोज रेड्डी, यशवंत महाविद्यालय नांदेड येथील डॉ. मनोज पैंजणे, महात्मा फुले महाविद्यालय मुखेड व येथील डॉ. जयदीप कहाळेकर, व राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील डॉ. अनिरुद्ध बिराजदार हे निवड समीती सदस्य म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटातून नांदेड विभागातील सी झोन संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या गटात बी झोन ने विजेतेपद पटकाविले. व तृतीय स्थानी डी झोन राहिले. बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपूके यांच्या उपस्थितीत पार पडला. या संघातून सहा राज्यांच्या विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, श्री कांबळे, श्री शिवाजी पाटील, श्री कुमार कोळी, श्री सिध्देश्वर कुंभार यांनी परीश्रम घेतले.