ऐन दिवाळीचे अभ्यंगस्नान यंदा जलधारा संगे करावे लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसाचा मुक्काम अजून आठवडाभर लांबला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा
राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यताय. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. त्याची तीव्रता वाढतेय. अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कुठे पाऊस?
महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातल्यात जयसिंगपूरमध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे घराघरात गुडघ्या इतके पाणी साचले. आजही अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणांसह नगर, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्येही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
काढता पाय घेणार
परतीच्या पावसाचा प्रवास यंदा आठवडाभर लांबणीवर पडलाय. येणाऱ्या दोन दिवसांत मान्सून राज्यातून काढता पाय घेईल, असा अंदाज आहे. मात्र, या काळात दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.