पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांची आपत्ती व्यवस्थापन पथकाने केली सुटका
लातूर दि.22 ( जिमाका ) औराद शहा ता.निलंगा जिल्हा लातूर येथील तेरणा व मांजरा संगम येथे दोन्ही नद्यांच्या पुरामध्ये शेतात दोन युवक एक राहुल इंद्रजीत गवळी वय 30 वर्षे व दुसरे महेश कुशलगिर गिरी वय 32 वर्षे दोघे राहणार देवणी हे अडकलेले होते.
या घटनेची माहिती मिळताच त्यांना पुरातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी व निलंग्याचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी निलंगा येथील शोध व बचाव पथक घटनास्थळी पाचारण केले. या पथकामार्फत त्या दोन्ही युवकांची व त्यांच्यासोबत असलेला एका श्र्वानाची रेस्क्यू बोटच्या मदतीने सुखरूपपणे सुटका केली. या पथकाचे नेतृत्व अग्निशामन अधिकारी निलंगा श्री गंगाधर खरोडे यांनी केली.
जिल्हाधिकारी यांच्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन
सद्यस्थितीत मांजरा व तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे अतिरिक्त येणारा येवा नदी मार्गे विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.