• Sun. May 4th, 2025

लातूर जिल्ह्यात झाले दोन लाख 42 हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण

Byjantaadmin

Oct 21, 2022

लातूर जिल्ह्यात झाले दोन लाख 42 हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण

लातूर, दि. 21 : राज्यात लंपी चर्मरोगाचा जनावरांमध्ये होत असलेला प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवून दोन लाख 42 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. उर्वरित जनावरांच्या लसीकरणासाठी 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

लसीकरण झालेल्या पशुधनातही लंपी आजाराची लक्षणे दिसून आली असली तरी ही जनावरे गंभीर होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्यासाठी 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व गाई आणि वासरे यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या पशुधनाचे लसीकरण झालेले नाही, अशा पशुधन मालकांनी त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या नोंदवहीत किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करावयाच्या असून त्यानुसार संबंधित गावांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित केली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून लंपी रोगाची साथ सुरू झाली असून जळकोट तालुका वगळता इतर सर्व तालुक्यातील 160 गावांमध्ये ही साथ पसरली. जिल्ह्यात बाधित झालेल्या एकूण एक हजार 747 बाधित पशुधनापैकी एक हजार 137 जनावरे उपचारानंतर बरे झाली, तर 59 जनावरे मृत्युमुखी पडली. यापैकी 32 पशुधन मालकांना आठ लाख 16 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून उर्वरित पशुधनाची नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरु आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *