माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीनिमीत्त विलासबाग, बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ७८ जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २६, मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून विलासरावजी देशमुख यांनी असंख्य लोकहिताचे निर्णय घेतले. लोकहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासीकही ठरले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, वीजबील माफी, कर्जाचे पुर्नगठन, व्याजात दिलेली सवलत, फलोत्पादन
विकासासाठी दिलेली नुकसान भरपाई, दुष्काळी परिस्थितीत केलेल्या उपाययोजना, गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलेले विशेष पॅकेज, पशुधन जगविण्यासाठी राबवलेली मोहीम यासह इतर उपाययोजना, राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरल्या आहेत, विविध
योजनांच्या माध्यमातून शेती विकासाला चालना देऊन ग्रामीण भागाचा कायापालट करीत असतानाच उद्योग, व्यापार वृद्धीसाठी नियोजन करून राज्याचा समतोल विकास साधण्याची त्यांची कृती आजही मार्गदर्शक ठरते आहे.
अशा लोकविलक्षण अष्टपैलू नेतृत्वाच्या ७८ व्या जयंतीनिमित्त
शुक्रवार दि. २६, मे २०२३ बाभळगाव येथील विलासबाग येथे आदरांजली वाहण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे.
सकाळी ९.०० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मयूर उमेश सुकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर १०.०० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल. या सभेचे
सुत्रसंचालन गोंविद केंद्रे करणार आहेत. या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे