• Thu. May 1st, 2025

महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Byjantaadmin

May 25, 2023

महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून
तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर, (जिमाका):-जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून आवश्यकतेनुसार तिथे फलक, गतिरोधक, रॅम्बलर ट्रिप बसवावेत. त्यामुळे वाहनांची गती कमी होईल आणि संभाव्य अपघात होणार नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी ही संयुक्त पाहणी मोहीम राबवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सलीम शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिन्ही विभागाचे कार्यकारी अभियंता, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लातूर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी यापूर्वी सुचविलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही सुरु आहे. नवा रेणापूर नाका येथील चौक काढून तिथे सिग्नल बसविण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी वाहतूक पोलीस शाखेकडून देण्यात आली. लातूर येथून जाणाऱ्या ट्रॅव्हल्ससाठी शहराच्या बाहेर एक खाजगी स्टॅन्डची जागा शोधली असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोई यांनी यावेळी दिली.
औसा रोडवर रेमंड शोरूमच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी लावलेल्या होर्डिंगचे महानगरपालिकेने तात्काळ सेफ्टी ऑडीट करून त्याचा अहवाल द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या. तसेच बाभळगाव रोडवर काही ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. अशा ठिकाणी गतिरोधक तयार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. औसा – तुळजापूर महामार्गावरील आशिव टोल नाक्याजवळ पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार तिथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ते काम पावसाळ्यापूर्वी करून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
शहारातील ज्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणी रस्त्यावरून आताच पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी, तसेच शिवाजी चौकातील भुयारी मार्गात पाणी साचून रस्ता गुळगुळीत झाला असल्यामुळे गाड्या स्लिप होतात. त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *