नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया याना पोलिसांनी मानेला धरून न्यायालयात नेल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. मनीष सिसोदिया यांना आज दिल्लीतील राऊस एवेन्यू कोर्टात हजर केलं गेलं. यावेळी सिसोदिया यांना पोलिसांनी मानेला धरून नेल्याचं समोर आलं आहे. याचा व्हीडिओ आपच्या नेत्या अतिशी यांनी ट्विट केला आहे. त्याला रिट्विट करत केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
राऊस एवेन्यू कोर्टात जाताना पोलिसांनी मनीष सिसोदिया यांच्यासोबत असं धक्कादायक वर्तन केलं. मनीष सिसोदिया यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या या पोलिसाला तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी अतिशी यांनी केली आहे.
व्हीडिओमध्ये नेमकं काय?
अतिशी यांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये पोलीस संरक्षणात मनीष सिसोदिया कोर्टाच्या दिशेने जात आहेत. यावेळी काहीजण त्यांचा व्हीडिओ शूट करत आहेत. यावेळी यातील एक पोलीस अधिकारी व्हीडिओ काढणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी मागे चालत असलेल्या सिसोदिया यांच्या मानेला धरून जोरात त्यांना पुढे घेऊन जातो. या व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.
अरविंद केजरीवाल संतापले
दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी अतिशी यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. पोलिसांना मनीष सिसोदिया यांच्याशी असा दुर्व्य्वहार करण्याचा अधिकार आहे? पोलिसांना असं करण्यासाठी वरून आदेश होते का?, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.