• Sun. May 4th, 2025

‘त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला’

Byjantaadmin

May 19, 2023

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे, असे स्थानिक लोकांनी स्पष्ट केले आहे. गावकऱ्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेऊन भाजपाचा दंगल घडवण्याचा डाव हाणून पाडला आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

त्र्यंबकेश्वर प्रकरणी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाना पटोले म्हणाले, ‘राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव, अहमदनगर व आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासभा, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, भाजपा आध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा, लव्ह जिहाद संघटना या भाजपाशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून महाआरती केली. हिंदूशिवाय इतर धर्मांच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करु नये असे फलक झळकवले. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपा लोकांमध्ये धार्मिक वाद घडवून आणत आहे हे चिंताजनक आहे. मात्र राज्यातील जनता सुज्ञ असून भाजपाच्या अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही

त्र्यंबकेश्वर प्रकरणी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. धूप दाखवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली असल्याचे गावकरी व पोलीस सांगत आहेत. मात्र भाजपाशी संलग्न संघटना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. आचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली, त्यांचीच चौकशी फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

त्र्यंबकेश्वरच्या लोकांमुळे अनर्थ टळला

नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह सत्याग्रह केला होता. आज त्याच नाशिक जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवले जात आहे. मागील काही दिवसातील घटना पाहता भाजपा जाणीवपूर्वक अशा घटनांना खतपाणी घालण्याचे काम करु शकते. मात्र त्र्यंबकेश्वरच्या लोकांनी घेतलेली भूमिका व नाशिकमधील स्थानिक प्रसार माध्यमांशी घेतलेली भूमिका यामुळे मोठा अनर्थ टळला, त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजेत असं पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *