कर्नाटक निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर भाजपने आपलं लक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीकडे वळवलं आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास भाजपनं सुरवात केली आहे.प्रत्येक लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने ‘कमल मित्र’योजना तयार केली आहे. या योजनेचे उद्धघाटन आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोनशे महिला या ‘कमल मित्र’म्हणून कार्यरत होणार आहेत. य महिला पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. मोदी सरकारच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कमल मित्र’काम करणार आहेत. मोदी सरकारच्य उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मातृत्व वंदना योजना आदी पंधरा योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.
या ‘कमल मित्र’ योजनेसाठी हिंदी-इंग्रजीसह तामिळ, तेलगु, मल्लायम, कन्नड, बंगाली, आसामी, गुजराती, मराठी भाषांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दिल्ली मध्ये आज (शुक्रवारी) जे.पी.नड्डा यांच्या हस्ते या योजना प्रारंभ होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. या योजना सर्वसामान्यांसाठी फलदायी ठरल्या आहेत. मोदी सरकारने केलेली ही कामे सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पुण्यात कार्यकर्त्यांना केले.