कर्नाटक निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कर्नाटकनंतर या वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमधील हालचालींना वेग आला आहे. अशातच मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षेही पुर्ण होत आहेत. या नऊ वर्ष पूर्तीनिमित्त भाजपकडून मोदी @9 हे अभियान राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात या अभियानासाठी 11 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील काही विश्वासू सहकाऱ्यावर या अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वात एक समिती तयार करण्यात आली असून या समितीवर राज्यभरात हे अभियान राबवण्याची जबाबदारी दिली आहे.
मोदी @ 9 अभियानातील समितीत, प्रवीण दरेकर – संयोजक, डॉ. संजय कुटे – सहसंयोजक, श्रीकांत भारतीय, जयकुमार रावल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. धनंजय महाडिक, निरंजन डावखरे, राणा जगजितसिंह पाटील, चित्रा वाघ, राहुल लोणीकर, श्वेता शालिनी, या अकरा जणांच्या समितीवर महाराष्ट्रात मोदी @9 हे अभियान राबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष jp nadda हे देखील काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी भाजपला अधिकाधिक तरुण मतदारांना पक्षाशी जोडण्याचा कानमंत्र दिला. यासोबतच, नवीन मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनाही या अभियानात जोडण्यास सांगितले आहे. तसेच, भाजपचे आमदार, खासदारांनाही कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.