• Sun. May 4th, 2025

मुख्यमंत्री शिंदे व भाजपला धक्का:संजय देशमुखांनी बांधून घेतले शिवबंधन

Byjantaadmin

Oct 21, 2022

मुंबई:-माजी राज्यमंत्री तथा दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवबंधन देशमुख यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

विद्यमान मंत्री संजय राठोड आणि भाजपला हा धक्का मानला जात असून दिग्रसमधून संजय राठोडांना ते मोठे आव्हानही देऊ शकतात. देशमुख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. याच वेळी ठाण्यातील संजय घाडीगावकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला.

गेल्या अनेक दिवसांपासून संजय देशमुख शिवसेनेत (ठाकरे गट)प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यात शिवसेना (ठाकरे गट) प्रवेशाबाबत चर्चाही झाली होती. त्यानुसार गुरुवारी संजय देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. राजकारणामध्ये संबंध नाही असे लोक, तसेच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्यासोबत येत आहेत. सगळ्यांचे म्हणणं एकच आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला लवकरच ठाण्यात जाहीर सभा घ्यायची आहे. पोहरदेवीच्या दर्शनाला यायचे आहे, तारीख तुम्ही ठरवा, मी येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचे नाव आणि चिन्ह गोठवले. ठीक आहे पण मी माझे नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *