मुंबई;-राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतीपिके वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती, परंतु शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
पटोले म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकार तत्काळ मदत देऊन दिवाळी गोड करेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार हे शेतकरी हिताच्या केवळ पोकळ गप्पा मारत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांचे दुःख, त्याचे अश्रू दिसतच नाहीत.
कृषिमंत्र्यांना शेतातील तळी दिसत नाहीत
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे कृषिमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील आहे. मराठवाड्यातील शेताच्या बांधावर कृषिमंत्री गेले तर ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे की नाही हे त्यांना कळेल. शेतात बघावे तिथपर्यंत पाणीच पाणी, शेतात तळी निर्माण झाली, पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषीमंत्र्याचे विधान थट्टा करणारे आहे.