महाराष्ट्र महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पदवी वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा. अशोकराव पाटील निलंगेकर, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळउपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर उपस्थित होते. पदवी वितरण समारंभात प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करत असताना मा. अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये अधिक कार्यक्षम बनले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात विविध क्षेत्रातील संधी आपली वाट पाहत असून आपण त्या संधी मिळवल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. या समारंभासाठी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी मार्गदर्शन करत असताना निसर्ग नियमाप्रमाणे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी आपणामध्ये मुलभूत बदल घडवून आणला पाहिजे. संधी सर्वांसाठी खुल्या आहेत पण सर्वांनाच या संधी उपलब्ध होतील असे नाही. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे असलेल्या संधी मिळवण्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि क्षमता आपणात निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्यामध्ये निर्णय क्षमताही निर्माण केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आपण मिळवलेल्या पदवीचा उपयोग होऊ शकतो. आपल्यातील कार्यक्षमतेने आपल्या समोरील विश्वात आपली आवश्यकता आपण निर्माण केली पाहिजे. असे मत पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. विजय पाटील निलंगेकर यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा समाज व देशहितासाठी उपयोग करावा, असे आवाहन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदवी वितरण समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागप्रमुख डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. नरेश पिनमकर यांनी केले. या पदवी वितरण सोहळ्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, बी.व्होक. व बहिस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभागप्रमुख डॉ. भास्कर गायकवाड, शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर खांडेकर, मनोहर एखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.