• Sun. May 4th, 2025

लोकसभेपर्यंत मविआतील अनेक नेते भाजपात प्रवेश करतील’, बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Byjantaadmin

May 18, 2023

शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याची तयारी सुरू केलेली असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केला आहे. तसेच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा भाजपकडून बदला घेतला जाणार असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. भाजपाने पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यावेळी बोलताना बावनकुळेंनी मोठं विधान केलं आहे.

भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रात राजकीय ब्लास्ट होणार असून नेत्यांची नावंही योग्यवेळी समोर येतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीपूर्वी पुण्यातील भाजपात मोठे फेरबदल केले जाणार असून कसब्यातील पराभवाचा बदलाही घेतला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कसब्यात तीन विरुद्ध भाजपा अशी लढाई झाल्यामुळं आमचा पराभव झाला. परंतु आता आम्ही शिवसेनेशी युती केलेली आहे. राज्यात आमच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामं केली जात आहे, त्यामुळं जनता कुणाच्याही भुलथापांना बळी पडणार नाही. २०१९ साली युती असताना शिवसेनेचे आमदार निवडून आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, हे सर्वांनी मान्य केलं. परंतु उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी भूमिका बदलून भाजप-राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं सांगत बावनकुळे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *