किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या मणक्यावर इंजेक्शन दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता घटनेच्या वर्षभरानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हाऱ्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली असून रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डीएन राठी असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. तर लक्ष्मण माळेकर असं वर्षभरापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील गोमती क्लिनिकमध्ये लक्ष्मण माळेकर हे किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी डॉक्टर डीन राठी यांनी माळेकर यांच्या मणक्यात इंजेक्शन दिलं. त्यानंतर काही तासांच्या आत लक्ष्मण माळेकर यांचा मृत्यू झाला, डॉक्टरांनी मणक्यात इंजेक्शन दिल्यानेच माळेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात डीन राठी यांच्या हलगर्जीपणामुळेच लक्ष्मण माळेकर यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तेल्हारा पोलिसांनी आरोपी डीएन राठी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण माळेकर यांची हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोप डीएन राठी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर आता डीएन राठी यांच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तेल्हारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे हे करीत आहे.