• Sun. May 4th, 2025

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Byjantaadmin

May 18, 2023

नगरः एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल‌, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. एसटी महामंडळाच्या धावलेल्या पहिल्या बसचे वाहक ते गेल्यावर्षी धावलेल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटक अशा तब्बल ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.

Laxman Kevate, the first bearer, conductor, Ahmednagar, ST Bus, State transport

आज, गुरुवारी सकाळी नगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वतीने विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळे तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अर्पण केली. नगर जिल्ह्यातील सर्व आगारातून लक्ष्मण केवटे या पहिल्या वाहकाला श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले आहेत.

एसटीचा चालता बोलता साक्षीदार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण केवटे हे नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक होते. ही बस नगर शहरातील माळीवाडा ते पुणे शहरातील शिवाजीनगर अशी धावली. त्यावेळी या बसचे तिकिट २ रुपये ५० पैसे होता. त्यावेळी लक्ष्मण केवटे यांना ८० रुपये पगार होता. नागरिकांनी या बसची पूजा केल्याची आठवणही देऊ त्यांनी सांगितली होती. लक्ष्मण केवटे एसटी महामंडळातून ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त झाले. येत्या एक जून रोजी एसटी महामंडळाच्या सेवेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी सकाळी ८ वा. धावली. ३० असनांची क्षमता होती. बेडफोर्ड कंपनीची बनावट होती. या प्रवासात चास, सुपे, शिरूर, लोणीकंद या ठिकाणी प्रवाशांनी बसला थांबवले व प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. खाजगी बससेवा देणारे महामंडळाच्या बसला विरोध करतील, ही शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या पहिल्या बसला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *