पुण्यातील खडकवासला धरणात सोमवारी सकाळी तब्बल नऊ मुली बुडाल्या होत्या, त्यापैकी सात मुलींना वाचवण्यात आलं असून दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. परंतु धरणाच्या किनाऱ्या दशक्रिया विधी सुरू असताना मुलींचा आवाज येताच हातातलं काम सोडून थेट धरणात उडी मारणारे ५५ वर्षीय संजय माताळे यांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक केलं जात आहे. माताळे हे गोऱ्हे खुर्द येथील रहिवासी असून खडकवासला धरणात बुडालेल्या सात मुलींना त्यांनी जीवदान दिलं आहे. त्यानंतर पीएमआरडीएचं अग्निशमन दल आणि हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
सोमवारी सकाळी पोहण्यासाठी आलेल्या नऊ तरुणी पुण्यातील खडकवासला धरणात बुडाल्या होत्या, त्यावेळी संजय माताळे हे धरणाच्या काठावर दशक्रिया विधी पार पाडत होते. त्यावेळी धरणात बुडत असलेल्या मुलींचा आवाज माताळे यांना ऐकू आला. त्यावेळी त्यांना हातातलं काम सोडून मुलींना वाचवण्यासाठी थेट धरणात उडी मारली. त्यानंतर संजय माताळे यांनी सात मुलींचा जीव वाचवला. परंतु आणखी दोन मुलींना वाचवता न आल्यामुळं माताळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. याशिवाय मी मुलींना बाहेर काढलं त्यावेळी अनेक तरुणींच्या तोंडामध्ये पाणी गेल्याने त्या बेशुद्ध झालेल्या होत्या, असंही संजय माताळे यांनी म्हटलं आहे.
बुडणाऱ्या तरुणींसाठी देवदूत ठरलेले संजय माताळे बोलताना म्हणाले की, सकाळी स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू असताना मला काही तरुणींचा आरडाओरड ऐकू आला. त्यावेळी धरणाच्या भिंतीजवळ गेलो असता तिथं मुली बुडत असल्याचं मला दिसून आलं. मी तातडीनं धरणात उडी मारून सात मुलींना बाहेर काढलं. परंतु त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळं त्या बेशुद्ध झाल्या होत्या, असं माताळे यांनी म्हटलं आहे. तसेच आणखी दोन मुलींना वाचवता आलं नसल्यामुळं संजय माताळे यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे.