नवी दिल्ली : कर्नाटकातील मानहानीकारक पराभवाने भारतीय जनता पक्ष पुरता हादरून गेला आहे. त्यामुळेच पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने सर्व खासदारांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे. सर्व राज्याच्या प्रदेशाध्यक्षांनी महिनाभरात सर्व खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातील कामांचा आढावा घेऊन पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना अहवाल सादर करायचा आहे. रिपोर्ट कार्डच्या आधारे २०२४ ची उमेदवारी ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
. संबंधित खासदारांच्या मतदारसंघात केंद्र सरकारच्या कल्याणकारी कामांची स्थिती, खासदारांची लोकप्रियता, मतदारसंघात घालवलेला वेळ आणि सोशल मीडियावरील त्यांची सक्रियता याच्या आधारे खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आह. आगामी २०२४ मध्ये तिकीट वाटपासाठी हा मोठा आधार मानण्यात येणार आहे. याआधीही भाजपने BJP खासदार आणि मंत्र्यांकडून आपापल्या भागात झालेल्या कामांची माहिती मागवण्यात आली होती.
लोकसभेच्या त्या ७० मतदारसंघावर लक्ष केंद्रित
ता. ३० मे ते ३० जून दरम्यान महिनाभर चालणाऱ्या ‘विशेष जनसंपर्क अभियाना’अंतर्गत देशातील ३९६ लोकसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधला जाणार आहे. दरम्यान, खासदारांच्या क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती राज्यातील पथकांकडून जमा केली जाणार आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, त्यांच्याकडे येत्या वर्षभरात विशेष लक्ष केंद्रीत करून जनमाणसं पक्षाच्या बाजूने करण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या निवडणुकीत काठावर विजय मिळविलेल्या ७० लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
चार राज्यांतील निवडणुकीची चिंता
कर्नाटकातील निकाल विरोधात गेल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत भाजमध्ये चिंता वाढली आहे. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील पराभवाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो, याचे पक्ष सखोल आकलन करत आहे. या वर्षी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होईल, याचाही अंदाज घेतला जात आहे.
छत्तीसगड-राजस्थानबाबत संभ्रम
छत्तीसगडच्या निवडणूक निकालांबाबत पक्षांतर्गत चिंतेचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेल्या सत्ताविरोधी घटकाची तीव्रता कशी असेल, याचीही चाचपणी केली जात आहे. राजस्थानमधील सत्ताधारी पक्षातील भांडणातही ‘वसुंधरा फॅक्टर’ पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला त्रास देत आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी या राज्यांतील निवडणुकांचे निकाल विरोधात गेल्यास त्याचा पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
त्या चार राज्यांत मोदींच्या अधिकाधिक सभा होणार
या चार राज्यांच्या निवडणुकीत चांगले परिणाम आणण्यासाठी सखोल काम केले जात आहे. भाजप विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत या निवडणुकीच्या राज्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो. या राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या अधिकाधिक जाहीर सभा घेऊन वारे पक्षाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.