भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेवर न आल्याने अतिरक्तस्रावाने रमेश याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
लातूरमध्ये ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१६ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अविनाश रमेश राऊत (वय २४ वर्ष) आणि शांताबाई रमेश राऊत (वय ५२ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकांची नावे आहेत. दोघेही सारोळा येथील रहिवाशी आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश काही कामानिमित्त आपल्या आईला घेऊन मोटारसायकलीवरून बाभळगावकडे निघाला होता.
त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये शांताबाई राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. खूप वेळ झाल्यानंतरही रुग्णवाहिका घटनास्थळी न आल्याने अतिरक्तस्रावाने रमेश याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अपघातस्थळापासून बाभळगाव रुग्णालय जवळच होते तरीही जखमीला उपचार मिळू शकले नाहीत. अपघात झाला त्यावेळी रुग्णालयात एकही कर्मचारी हजर नव्हता तसेच रुग्णवाहिकेला अपघातस्थळी येण्यासाठी १ तास लागला. यामुळे जखमी रमेश याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.