कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली आहे. या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. कर्नाटकातील हा विजय म्हणजे देशातील परिवर्तनाची नांदी असल्याचा दावा देखील काॅंग्रेसकडून केला जातोय. या निवडणुकीत `बजरंग बली`, चा मुद्दा देखील शेवटच्या टप्यात चर्चिला गेला. यावरूनच आता काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला आहे.
कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करतांनाASHOK CHAVAN म्हणाले, `बजरंग बली की जय`, ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती! विजयासाठी मतदारांचे, अखिल भारतीय काॅंग्रेसच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या निकालाचा अन्वयार्थ स्पष्ट आहे.
जनतेला विकास हवा, देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. सत्तेच्या जोरावर लोकशाही पद्धतीने निवडून आलेली विरोधकांची सरकारे फोडाफोडीचे राजकारण करून पाडले आणि सत्ता बळकावणे हे जनतेला अजिबात मान्य नाही. कर्नाटकात देखील भाजपने गेल्यावेळी हेच केले होते. पण आता जनतेला विकासावर बोलणारे, कृती करणारे सरकार हवे आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, सुरक्षा या विषयावर कर्नाटकातील जनतेने मतदान केले आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात महिलांच्या प्रश्नांनाना प्राधान्य दिले होते. महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास, आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा मदत, बेरोजगार तरुणांना भत्ता हे विषय आम्ही वर्षभरात सोडवण्याचे आश्वासन दिले होते. याचा परिणाम महिलांच्या मतांचे प्रमाण वाढवण्यावर झाला. या उलट भाजपने बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा, केरळ स्टोरी चित्रपटावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या मुद्यांना प्राधान्य दिले. जे लोकांना आवडले नाही, असेही चव्हाण म्हणाले.
सहा मतदारसंघात सभा, तीन ठिकाणी विजय ; अशोक चव्हाणांना `फिप्टी-फिप्टी` यश…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election) महाराष्ट्रातून ज्या दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली होती, त्यात अशोक चव्हाण यांचे नाव होते. चव्हाण हे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय दिल्लीत त्यांचा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह वरिष्ठांशी चांगला संपर्क आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सहा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या सहापैकी चिकोडी सदलगा, बेळगाव ग्रामिण, भालकी या तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा विजय झाला आहे. तर उर्वरित निपाणी, खानापूर आणि औराद या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आठवडाभर ठाण मांडून चव्हाण यांनी या मतदारसंघात प्रचार सभा, रॅलीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून अशोक चव्हाण यांना मिळालेले यश हे फिप्टी फिप्टी आहे. परंतु कर्नाटक राज्यात काॅंग्रेसची बहुमतासह सत्ता आल्यामुळे चव्हाण यांच्यावर सोपवलेल्या सहा पैकी तीन मतदारसंघातील विजय देखील महत्वाचा ठरला.