राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरु असते. कोणत्याही विषयावरून आजकाल बॅनर लागण्याचे दिसून येतात. यावरून टीका, आरोप-प्रत्यारोप होतात. अशातच आता केंद्र सरकारकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी)चा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, असं लिहालं आहे.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी ED ने नोटीस पाठवली आहे. त्याविरोधात जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत.
‘भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा’, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा “जाहीर निषेध” चा डिजिटल बोर्ड लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.