बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या २०१९ सालच्या (BJP Operation Lotus) मोहिमेत गळाला लागलेल्या १७ आमदारांपैकी केवळ ६ जणांचा या विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) विजय झाला आहे. तर एच. विश्वनाथ व रोशन बेग यांनी यावेळी निवडणूक लढविली नव्हती.
दावणगेरेचे आमदार आर. शंकर, तर विजयनगरचे आमदार व मंत्री आनंद सिंग यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. उर्वरित १३ जणांना भाजपने उमेदवारी दिली, पण त्यापैकी सात जणांचा पराभव झाला आहे. त्यात प्रामुख्याने विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, कृषीमंत्री बी. सी. पाटील, माजी मंत्री श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी यांचा समावेश आहे.
मतदारांनी दलबदलू आमदारांना शिकविला धडा
२०१८ साली यापैकी काही congress तर काहीजण धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही १७ जणांपैकी १५ जण निवडून आले होते, तर दोघांचा पराभव झाला होता. २०२३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जणांना भाजपने उमेदवारी दिली होती, पण या निवडणुकीत मात्र सात मतदारसंघातील मतदारांनी दलबदलू आमदारांना धडा शिकविला आहे. ऑपरेशन कमळ राबविल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एच. विश्वनाथ व एम. टी. बी. नागराज यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विश्वनाथ यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती. त्यामुळे विश्वनाथ यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढविली नाही.
मतदारांनी पुन्हा केला पराभव
एम. टी. बी नागराज यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला, तरी त्यांना भाजपने यावेळी व्हसकोटे मतदारसंघातून पुन्हा संधी दिली होती, पण मतदारांनी पुन्हा त्यांचा पराभव केला आहे. ऑपरेशन कमळमधील गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर, के. आर. पूरचे आमदार बैराती बसवराज, महालक्ष्मी ले-आऊटचे आमदार के. गोपालय्या व राजराजेश्वरी नगरचे आमदार एन. मुनीरत्न हे विजयी झाले आहेत.
राजकीय भवितव्य टांगणीला
२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधित १०४ जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे मग भाजपने काँग्रेस व धजदच्या असंतुष्ट आमदारांना गळाला लावले. दोन्ही पक्षाचे मिळून १७ आमदार गळाला लागले. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यातील बहुतेकजण पोटनिवडणुकीत विजयी झाले. काहीना मंत्रिपद मिळाले, तर काहींची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. मात्र, पक्षांतर केलेल्या १७ जणांच्या विरोधातील रोष यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बाहेर पडला. सात जणांना त्याचा फटका बसला. शिवाय आता त्यांचे राजकीय भवितव्यही टांगणीला लागले आहे.