बेळगाव : एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री विनय कुलकर्णी (Vinay Kulkarni) यांनी धारवाडची लढाई जिंकली आहे. योगेश गौडा हत्याप्रकरणी (Yogesh Gowda Murder Case) संशयित आरोपी असलेल्या कुलकर्णी यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे कुलकर्णी यांना मतदारसंघात प्रचारासाठी जाता आले नाही. त्यांच्या पत्नी शिवलिला, तीन मुले व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुलकर्णी यांना निवडून आणले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांचा विजय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग
मुळात कुलकर्णी यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी असूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. शिवाय धारवाड (Dharwad) जिल्ह्यातील congress (Congress) उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे धारवाड जिल्ह्यातील प्रवेशबंदी उठविण्याच्या मागणीसाठी कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी कायम ठेवली. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.
कुलकर्णींना जिल्ह्यात बंदी
त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही matadsanghat जाता आले नव्हते, त्यांच्यातर्फे पत्नी शिवलिला यांनी कार्यकर्त्यांसह जावून अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत कुलकर्णी यांना ८९ हजार ३३३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व भाजपचे उमेदवार अमृत देसाई यांना ७१ हजार २१९ मते मिळाली.