कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल हाती आले असून काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहे. कर्नाटकच्या सत्तेवर कोण विराजमान होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या निकालानंतर भाजपाचं अधःपतन होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते.
“देशातील जनतेला तोडाफोडीचं राजकारण पटलेलं नव्हतं. कर्नाटक हे उच्च विद्याविभूषित राज्य आहे. कर्नाटकात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणं अपेक्षित होतं. पण भाजपाने तिथे विकास केला नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. विकासाच्या कामात कमिशनची टक्केवारी ४० वर गेली. अशा परिस्थिती भाजापा वाटलं की आपण निवडणूक जिंकू शकत नाही त्यामुळे त्यांनी बजरंग बलीचा मुद्दा आणला. बजरंग बली, तोडो bjp की नली. बजरंग बलीची कृपा काँग्रेसला मिळाली. बजरंग बलीचा आशीर्वाद मिळाला असं वाटतं. धर्माचं आणि जातीचं राजकारण दिर्घकाळ करता येणार नाही. यातून देश उद्ध्वस्त होईल. राजकारणात निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे. परंतु, मुळ मुद्द्यापासून भरकटत जाऊन कोणत्याही पद्धतीने या राज्यात सत्ता स्थापन करण्याची हा निर्धार जनतेने धुळीस मिळवले”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“ही सुरुवात आहे. याचं लोण सर्वत्र देशात पसरत आहे. सरकारसंदर्भात जे काही मुद्दे पुढे आहे, त्याला नाकारण्याचं काम सुरू झालं आहे. महाराष्ट्रातही होईल. आता होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हा बदल होईल. कर्नाटक मैलाचा दगड ठरले आणि भाजपाच्या अधःपतनाची सुरुवात होईल. भाजपाचे देशभर अधःपतन होईल. देशात पुन्हा भाजपा केंद्रात दिसणार नाही. त्याची सुरुवात कर्नाटकात सुरुवात झाली आहे”, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.