ठाणे, 12 मे : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. मात्र निकाल शिंदेंच्या बाजूने दिला. यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून येत आहेत. दोन्ही गटांकडून निकालाचं स्वागतही केलं जात आहे. दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संभ्रमात टाकणारा असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, माझ्याविरुद्ध केस सुरू असताना मला न्यायालयाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस यायची. त्यातली भाषा किचकट असते. त्यात मला अटक केलीय की सोडलय हेच कळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने निकालात अनेक गोष्टी सांगितल्या. प्रोसेस चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय त्याचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे.
उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे प्रश्न आहेत त्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. त्यांचे प्रश्न मला विचारू नका. तो वेगळा पक्ष आणि माझा वेगळा पक्ष आहे. मला त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ नका घालवू.आधीच्या मुख्यमंत्र्यांना जपून राहिलं पाहिजे असा सल्ला राज ठाकरेंनी दिला होता. तर आताच्या मुख्यमंत्र्यांनाही तो सल्ला देणार का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे. आधीचे जपून राहिले नाही, त्यामुळे हे सगळं घडलं.