बीड, : ऊस घालूनही बील मिळत नाही. अनेक वेळा मागणी केली मात्र कारखाना दुर्लक्ष करतोय. मग मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं ? या विवंचनेत असणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आपण विष का पिलो? हे विष प्राशन केल्यानंतर व्हिडिओ बनवत शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडत सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्यासाहेब हरिभाऊ पौळ (वय 40) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत तात्यासाहेब पौळ यांनी अहमदनगरच्या पियुष शुगर लिमिटेड वाळकी या कारखान्याला आपला ऊस घातला होता. या ऊसाचे बील मिळावे यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून तात्यासाहेब पाठपुरावा करत होते. मात्र पाठपुरावा करूनही बील मिळत नसल्याने, आता मुलीच्या लग्नाला घेतले कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेत तात्यासाहेब यांनी 2 दिवसांपूर्वी विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या का करतोय ? याचा व्हिडीओ बनवला. मात्र उपचारादरम्यान आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, माझ्या मित्राकडे अवघी 2 एक्कर शेती आहे. त्याच शेतीवर तात्यासाहेब पौळ हे कुटुंबाची गुजराण करत होते. यादरम्यान त्याच्या मुलींचे लग्न झाले. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसं फेडावं असा प्रश्न त्याच्यापुढे होता. त्यामुळे अनेक वेळा चकरा मारूनही बील न दिल्याने या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कुटुंबीयांना कारखान्याने 50 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी मयत शेतकऱ्याचे मित्रा काळे यांनी केली आहे.
दरम्यान, सरकार अन् मंत्र्यांना आतातरी जाग येणार का आणि सत्ता टिकवण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी, आपला जीवपणाला लावणाऱ्या मंत्र्यांना बीड जिल्ह्यातील हे वास्तव दिसणार का? असा सवाल संतप्त शेतकाऱ्यांमधून होत आहे.