लातूरकरांची मुलगी सावलीत सुखात नांदावी-अदिती अमित देशमुख
महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण
विलासराव देशमुख फाऊंडेशनचा उपक्रम
लातूर प्रतिनिधी : विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना स्वावलंबी, सक्षम करून त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर नजीकच्या हरंगूळ (खु) येथील महिलांना मोफत शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून त्यांना भविष्यात स्वताचा व्यवसाय करता यावा असा दृष्टीकोन ठेऊन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक क्रांती उफाडे यांनी हरंगुळ खु. येथे महिलांना कुर्ती, पॅन्ट, लहान मुलींचे ड्रेस, ब्लाउज, घागरा पेटीकोट आदी विविध प्रकारचे कपडे सध्याच्या डिझाइननुसार शिवण्याचे प्रशिक्षण महिलांना देत आहेत. या प्रशिक्षणामध्ये गावातील १३० पेक्षा अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदविला असून प्रशिक्षणाला गावातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या समनव्यक संगिता मोळवणे, सरपंच दादाराव पवार, उपसरपंच, धनराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी महिला व संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे यांनी परिश्रम घेतले.
लातूरकरांची मुलगी सावलीत सुखात नांदावी
आपण विविध क्षेत्रात चांगली वाटचाल करीत आहोत. यासोबत लातूरकरांच्या घरातील मुलगी ही कुठेही मागे राहू नये तिला सर्व क्षेत्रातील शिक्षण आणि संधी मिळाली पाहिजे यासाठी मुली, महीलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशनकडून ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या पूढाकारातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाचे हे उपक्रम भविष्यात लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यात राबविण्यात येणार आहेत.
लातूरकरांची मुलगी लग्नानंतर किंवा भविष्यात दुसरीकडे गेली तरी तेथे व्यवसाय किंवा रोजगारासाठी उन्हातान्हात न फिरता तिला आपला व्यवसाय घरी सावलीत बसून करता आला पाहिजे आणि यातून तिला चांगला मोबदला मिळाला पाहिजे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सौ. अदिती अमित देशमुख यांनी सांगितले.