• Sun. May 4th, 2025

15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS

Byjantaadmin

May 10, 2023

मुंबई, 10 मे: शौर्य फक्त पुरुषच दाखवू शकतात असं नाही. महिलाही याबाबतीत कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका महिला IPS ऑफिसरबाबत सांगणार आहोत ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी आतंकवादी थरथर कापतात, ज्या AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात. नक्की कोण आहेत या दबंग महिला IPS ऑफिसर? जाणून घेऊया.

आसामच्या महिला आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर हे शौर्याचे दुसरे नाव असून तिच्या नावाने दहशतवादी हादरतात. संजुक्ता पराशर आसामच्या जंगलात AK-47 घेऊन फिरतात. 15 महिन्यांत 16 दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला आहे. तसंच 64 हून अधिकांना अटक करण्यासाठी आणि टन दारूगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. आसाममधील बोडो अतिरेक्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी संजुक्ता पराशर हे नाव पुरेसे आहे.

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, संजुक्ता पराशरचा जन्म आसाममध्ये झाला आणि तिथूनच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. बारावीनंतर संजुक्ता यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली. यानंतर त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात पीजी आणि यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये एमफिल आणि पीएचडी केली. संजुक्ता पराशर या 2006 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि त्यांनी नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय 85 वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मेघालय-आसाम केडरची निवड केली होती.

इथे गाजवला पराक्रम

2008 मध्ये, संजुक्ता पराशर यांची पहिली पोस्टिंग आसाममधील माकुम येथे असिस्टंट कमांडंट म्हणून झाली होती. यानंतर त्यांना उदलगिरी येथे बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी पाठवण्यात आले.

AK-47 घेऊन गाठतात जंगल

संजुक्ता पराशर, आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एसपी असताना, त्यांनी सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीचे नेतृत्व केले आणि स्वत: एके-47 सह वोडो अतिरेक्यांचा सामना केला. या ऑपरेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्या त्यांच्या संपूर्ण टीमसोबत हातात एके-47 रायफल घेऊन दिसल्या. संजुक्ता पराशर यांनाही अतिरेकी संघटनेकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, मात्र त्यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. दहशतवाद्यांसाठी त्या काळ आहेत आणि त्यांच्या नावाने दहशतवादी हादरतात.

15 महिन्यांत 16 अतिरेक्यांना कंठस्नान

संजुक्ता पराशर यांनी 2015 मध्ये बोडो दहशतवादी विरोधी मोहिमेचे नेतृत्व केले आणि अवघ्या 15 महिन्यांत 16 अतिरेक्यांना ठार केले. याशिवाय त्यांनी 64 बोडो अतिरेक्यांनाही तुरुंगात पाठवले होते. यासोबतच संजुक्ताच्या टीमने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. त्यांच्या टीमने 2014 मध्ये 175 तर 2013 मध्ये 172 दहशतवाद्यांना तुरुंगात पाठवले होते.

एक कडक पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावण्याव्यतिरिक्त, संजुक्ता पराशर तिला कामातून सुट्टी मिळाल्यावर मदत शिबिरांमध्ये लोकांना मदत करण्यात वेळ घालवतात. त्या म्हणतात की त्या विनम्र आणि प्रेमळ आहे आणि फक्त गुन्हेगारांनी त्यांना घाबरले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *