• Sun. May 4th, 2025

कारखान्याच्या कंत्राटदाराकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक जिवे मारण्याचीही धमकी अंबादास जाधव यांच्याकडून पत्रपरिषदेत गंभीर आरोप

Byjantaadmin

Oct 18, 2022

कारखान्याच्या कंत्राटदाराकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक जिवे मारण्याचीही धमकी अंबादास जाधव यांच्याकडून
पत्रपरिषदेत गंभीर आरोप

लातूर/प्रतिनिधी:निलंगा तालुक्यातील अंबुलगा साखर कारखाना चालविण्यास घेतलेले कंत्राटदार आणि चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे व संचालिका सौ.रेखा बोत्रे यांनी खोटे करार करून आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.पैसे मागितल्यानंतर त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली असल्याची माहिती निलंगा तालुक्यातील रहिवासी तथा व्यापारी अंबादास जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पत्रकारांना माहिती देताना अंबादास जाधव म्हणाले की,मी हंगरगा सिरसी येथील रहिवासी असून निलंगा येथे श्री.दीपक किराणा,भुसार अँड ऑइल मर्चंट या नावाने माझा व्यवसाय आहे. व्यावसायिक कारणातून बाबुराव बोत्रे व त्यांच्या पत्नी सौ.रेखा बोत्रे यांची ओळख झाली.त्यांनी माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे असणारा ओंकार साखर कारखाना करारावर घेऊन आपण चालवित असल्याचे सांगितले.कारखान्यास शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा हप्ता द्यावयाचा असून दुरुस्तीही करावयाची आहे.त्यासाठी ५ कोटी रुपयांची गरज आहे.आपण कारखान्याची साखर खरेदी करावी.त्याची आगाऊ रक्कम म्हणून ५ कोटी रुपये द्यावेत. त्यानुसार २९०० रुपये प्रतिक्विंटल दराने आपणास १७ हजार २४१ क्विंटल साखर देऊ असा करार त्यांनी केला.२१ मे २०२१ रोजी निलंगा येथे हा करार झाला.त्यानंतर त्यांना धनादेशाद्वारे ४ कोटी ८५ लाख रुपये आपण दिले.१५ लाख रुपये पूर्वीच दिले होते.नोटरींच्या समक्ष ५०० रुपयांच्या मुद्रांकावर हा करार करण्यात आला होता. गाळप हंगाम सुरू झाला नाही किंवा साखरेचे उत्पादन कमी झाले तर ३१ मार्च २०२२ पर्यंत १२ टक्के व्याज दराने रक्कम परत करण्याचे करारात ठरले होते.
अंबादास जाधव यांनी पत्रकारांना सांगितले की,बोत्रे यांनी करार पाळला नाही. साखरही दिली नाही.यात माझे ८५ लाख रुपयांचे नुकसान झाले. माझ्याकडून घेतलेल्या ५ कोटी पैकी २ कोटी ७७ लाख रुपये परत केले.उर्वरित रक्कम व नुकसान भरून देण्यासाठी हमीपत्र करून दिले.
यानंतर पैशांची मागणी केली असता मे महिन्यात २३ लाख रुपये दिले मात्र अद्यापही बोत्रे यांच्याकडून आपले २ कोटी रुपये येणे बाकी आहे.या पैशांची मागणी केल्यानंतर ३० सप्टेंबर रोजीचे प्रत्येकी १ कोटी रुपयांचे धनादेश त्यांनी मला दिले होते. परंतु ते वटले नाहीत.
पैसे मिळत नसल्याने दूरध्वनी केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.इतर व्यक्तीमार्फत गुंडगिरीची भाषा केली जात आहे.दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री निलंगा येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पैशांची मागणी केली.त्यावेळी त्यांनी आपणास जिवे मारण्याची धमकी दिली.बोत्रे यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी,अशी तक्रार आपण निलंगा पोलीस ठाण्यात केली आहे.या संदर्भात पोलीस अधीक्षकांना व राज्याच्या गृहमंत्र्यांनाही निवेदन दिलेले असल्याची माहितीही अंबादास जाधव यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *