अहमदनगर, : गेल्या काही दिवसांपासून मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या वादावर पडदा टाकण्याचं काम सुरू आहे. आज सामनामधून शरद पवारांवर जोरदार टीका करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांना चांगलंच सुनावलं आहे. मविआतून राष्ट्रवादीने बाहेर पडावं का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत देखील मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले थोरात?
शरद पवार हे नेतृत्व निर्माण करण्यास अपयशी ठरल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी म्हटलं आहे की, शरद पवार हे नवं नेतृत्व निर्माण करण्यास अपयशी ठरले असं म्हणता येणार नाही. नेतृत्व सांभाळण्यात त्यांना यश मिळालं आहे. थोडी मतमतांतरे असू शकतात, मविआमध्ये चर्चा करून हे विषय मार्गी लावले जाऊ शकतात असं थोरात यांनी म्हटलं आहे