नागपूर, 8 मे : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. अखेर शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर या चर्चेवर पडदा पडला. मात्र अजित पवार खरंच भाजपच्या संपर्कात होते का याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. यात भाजपचा कुठलाच डाव नव्हता. अजित पवारांचा आणि माझा गेल्या चार महिन्यांपासून संपर्क झाला नाही. ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नव्हते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
महाविकास आघाडीकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं. अजित पवार हे गेल्या चार महिन्यांपासून माझ्या संपर्कात नव्हते. ते आमच्या दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नव्हते. राष्ट्रवादीमध्ये मागच्या तीन दिवसांत जे काही झालं ती सगळी स्क्रिप्ट होती. शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार हे दुसरं कोणाला पक्षाचा अध्यक्ष कसा होऊ देतील. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.